मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर असताना शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगली बंदची हाक दिली आहे. यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे भाजवर निशाण साधलाय. शिवसेना खासदार संजय राऊत आणि उदयनराजे भोसले यांच्या वादावरून आज (दि १७) रोजी सांगली बंद चे आवाहन शिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या ,’ सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र असल्याचे मला वाटते. मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर असताना असा बंद चुकीचा आहे. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकविले, तिथे बंद करणे चुकीचे आहे. असे सुळे म्हणाल्या.
भाजपवर निशाणा
यावेळी पुढे बोलताना सुळे म्हणाल्या , आमच्या सरकारसमोर अनेक आव्हाने आहेत. शेतकरी, नोकरी, अर्थव्यवस्था याकडे प्रामुख्याने पाहणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आधीचे सरकार दडपशाहीचे होते. मात्र आमचे तसे नाही. चंद्रकांत पाटील यांना आमच्या सरकारवर टीका करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तो त्यांना संविधानाने दिला आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला.
संभाजी भिडे म्हणतात
आज सांगली बंदच्या पार्श्ववभूमीवर पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला अशी मागणी त्यांनी केली आहे. आमचा बंद कुठल्याही पक्षाच्या वा शिवसेनेच्या विरोधात नाही. उलट शिवसेना हवी या मताचा मी आहे. मात्र, समाजस्वास्थ्य बिघडू नये याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यायला हवी. राऊत यांना कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पदावरून काढावे, अशी मागणी भिडे यांनी केली.
काय आहे वाद
‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे.