मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभेच्या तोंडावर राजकीय पक्ष आपापल्या मोर्चेबांधणीला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही राज्यातील सर्व 288 जागांवर दोन हात करण्याचे ठरवले आहे असेही बोललं जात आहे. असे असतानाच प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर हेही विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. याबाबत आता खुद्द प्रकाश आंबेडकरांनीच खुलासा केला आहे. सुजात आंबेडकर निवडणूक लढवणार नसल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे. सुजात निवडणूक लढवणार आहे या अफवा आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दोन दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “माझ्या कुटुंबातून कोणीच विधानसभा निवडणूक लढवणार नाही. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सुजातचे वय बसत नाही. मी विधानसभा निवडणूक कधीच लढवत नाही.” असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. ज्यात म्हटलं जात आहे की, शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आगामी विधानसभेत बेलापूर किंवा परळी मतदारसंघातन लढतील आणि त्यांच्या विरोधातच प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर रिंगणात उतरतील अशी चर्चा केली जात आहे. अशा अनेक पोस्ट सोशलवर फिरत आहेत. या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Visit : bahujannama.com