मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश येथील मंदसौर येथे एका नाटकाचा सराव करताना खरोखरच फाशी लागल्याने नाटकातील एका कलाकार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी मृत्यू झालेल्या या विद्यार्थ्याचे नाव प्रियांशु मालवीय असून तो शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित नाटकाचा सराव करत होता. तो शाळेतील वार्षिक कार्यक्रमात शहीद-ए-आजम भगतसिंग आणि सुखदेव यांच्या जीवनावर नाटक बसवण्यात आले होते.
या नाटकात प्रियांशु इंग्रज शिपायाची भूमिका साकारत होता. तो शाळेतला कार्यक्रम झाल्यावर घरी येऊन आपल्या शेतात नाटकाचा सराव करत होता. दरम्यान तो भगतसिंग बनला असताना त्याला भगतसिंग यांना फाशी देण्याचा प्रसंग खेळायचा होता. त्यासाठी त्याने शेतातील बांबूच्या सालीचा फास फाशीसाठी तयार केला. पण तो फास त्याच्या गळ्याभोवती घट्ट आवळला गेल्याने त्याचा श्वास कोंडला गेला. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आणि घरातील लोकांनी जेव्हा त्याला पाहिले तेव्हा तो काहीच हालचाल करत नसल्याचे त्यांना समजले.
तसेच पोलिसांना घटनास्थळी एक मोबाईल सापडला असून त्यात शाळेतील नाटकाचा व्हिडिओ असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच व्हिडिओद्वारे पोलिसांनी आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रियांशूचा मृत्यू सराव करताना झाला, असा अंदाज लावला आहे.