मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लोक संक्रमीत होत आहेत. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्याची राजधानी मुंबईत शुक्रवारपासून (दि.2) कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या लोकलमध्ये पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की. मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कडक निर्बंध लावले जाणार आहेत. यावेळी त्यांनी मुंबईतील धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद करण्याचे संकेत दिले आहेत.
महापौर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या ?
– हॉटेल 50 टक्के उपस्थितीने चालवले जाणार. मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबईच्या लोकलमधून पुन्हा एकदा फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाईल.
– मॉल, थेटर पूर्णपणे बंद करणार आहोत, खासगी ऑफिसेस 2 शिप्टमध्ये चालवण्यावर भर देण्याचे आवाहन. दुकानं आणि बाजारपेठा एक दिवस आड सुरु ठेवले जातील, महापौरांचे संकेत
मुंबईतील बेड्सची परिस्थिती
मुंबईमधील रुग्णालयामध्ये किती बेड्स उपलब्ध आहेत याबद्दल माहिती देताना पेडणेकर यांनी सांगितले की, मुंबईत सध्या 16 हजार 561 एकूण बेड आहेत. त्यापैकी 12 हजार 628 बेड भरले आहेत तर 3933 बेड्स रिकामे आहेत.
मुंबईत 1627 ICU बेड आहेत. त्यापैकी 1303 वापरात आहेत. तर 324 बेड शिल्लक आहेत. शहरात 8914 एकूण ऑक्सिजन बेड आहेत. त्यापैकी 6695 बेड वापरात आहेत तर 2219 रिकामे आहेत.
मुंबईत एक हजार व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी 830 व्हेंटिलेटर बेड वापरात आहेत. तर170 रिकामे आहेत. शहरात 16 हजार बेडची क्षमता वाढवून 25 हजार करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.