नवी दिल्ली : वृत्तसंस्था- ऑक्सफोर्ड अॅडव्हान्स लर्नर डिक्शनरीच्या अद्ययावत आवृत्तीमध्ये आधार, तांदूळ, डब्बा, संप आणि लग्न या शब्दांसह 26 नव्या भारतीय इंग्रजी शब्दांना जागा मिळाली आहे. शब्दकोषाची 10 वी आवृत्ती शुक्रवारी जारी करण्यात आली. यामध्ये एकुण 384 भारतीय इंग्रजी शब्द आहेत. सोबतच चॅटबोट, फेक न्यूज आणि मायक्रोप्लास्टिकसह सुमारे 1,000 नवे शब्दसुद्धा या शब्दकोषात सहभागी करण्यात आले आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठ प्रेसने सांगितले की, शब्दकोष अनेक वर्षांपासून भाषेत होत असलेले बदल आणि विकासावर लक्ष केंद्रीत करत आहे. नव्या आवृत्तीत वापरातील भाषा आणि प्रासंगिक उदाहरण आणि वेळेनुसार अद्ययावत करणे यावर भर आहे.
शब्दकोषाची नवी आवृत्ती ऑक्सफोर्ड लर्नर्स डिक्शनरीची वेबसाइट आणि अॅपवर संवादात्मक सुविधेसह उपलब्ध आहे. वेबसाइटमध्ये दृश्य-ध्वनी शिक्षण, व्हिडिओ वॉल्कथ्रू (सॉफ्टवेअर), स्वयं अभ्यास उपक्रम आणि आय-रायटर आणि आय-स्पीकर टूल्ससारख्या अद्ययावत सुविधा आहेत. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी प्रेसच्या व्यवस्थापकीय संचालक (शिक्षण विभाग) फातिमा दादा यांनी सांगितले की, या आवृत्तीमध्ये 26 नव्या भारतीय इंग्रजी शब्दांना जागा मिळाली आहे, ज्यापैकी 22 छापिल आवृत्तीमध्ये आहेत तर उर्वरित 4 डिजिटल आवृत्तीमध्ये आहेत. काही अन्य भारतीय इंग्रजी शब्द ज्यांना शब्दकोषात स्थान मिळाले आहे ते आहेत आंटी (पहिल्यापासून असलेल्या ऑन्ट शब्दाचे भारतीय स्वरूप), बस स्टँड, डीम्ड यूनिव्हर्सिटी, एफआयआर, नॉन-व्हेज, रिड्रेसल, टेम्पो, ट्यूब लाईट, व्हेज आणि व्हिडिओग्राफ.
शब्दकोषाच्या ऑनलाइन आवृत्तीत ज्या चार भारतीय इंग्रजी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे ते आहेत, करन्ट (वीजेसाठी), लूटर, लूटिंग आणि उपजिल्हा.फातिमा यांनी सांगितले की, प्रचलित आणि सामान्य वापरातील शब्दांना सहभागी करणे हा मुख्य हेतू आहे. आम्ही संपूर्ण जगात इंग्रजी बोलताना वापरल्या गेलेल्या शब्दांचा अभ्यास करतो, ज्यानंतर हे शब्द सखोल परीक्षण प्रक्रियेतून जातात. त्यांनी सांगितले की, ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी प्रेस जागतिक स्तरावर इंग्रजी भाषेची संरक्षक आहे. यासाठी या शब्दांना या प्रक्रियेतून जावे लागते. शब्दकोषाच्या अॅपवर 86,000 शब्द, 95,000 वाक्प्रचार, 1,12,000 अर्थ आणि 2,37,000 उदाहरण आहेत. उल्लेखनीय म्हणजे या शब्दकोषाला 77 वर्षांचा इतिहास आहे. मुळ रूपात हा 1942 मध्ये जपानमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. 1948 मध्ये प्रथम ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी प्रेसने याचे प्रकाशन केले. लर्नर शब्दकोष हा त्याचे संस्थापक अल्बर्ट सिडनी हॉर्नबी यांच्या मुल्यांवर आधारित आहे, त्यांचा उद्देश जगभरात इंग्रजी भाषा शिकणार्यांना अर्थ समजण्यास मदत होणे हा होता.
Visit : bahujannama.com