नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या एका न्यायालयाने एका व्यक्तीला बलात्काराच्या आरोपातून मुक्त करताना म्हटले आहे की, ज्या दिवशी आरोपीने जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले, त्या दिवशी तक्रारदार त्याची पत्नी होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश उमेद सिंह ग्रेवाल यांनी म्हटले की, महिलेने या व्यक्तीवर आरोप केला की त्याने 5 जुलै 2016 रोजी तिच्यावर बलात्कार केला, परंतु, यास बलात्काराचे प्रकरण मानता येणार नाही, कारण ती त्या दिवशी आरोपीची पत्नी होती.
कोर्टाने दिले हे कारण
न्यायालयाने या व्यक्तीला मुक्त करताना म्हटले की, हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्त्याने आरोपीशी 2 नोव्हेंबर 2016 रोजी विवाह केला होता. तिच्या स्वत:च्या युक्तीवादाप्रमाणे आरोपीने तिच्यावर 5 जुलै 2016 ला बलात्कार केला, परंतु ती त्या दिवशी त्याची पत्नी होती.
पती पुर्वीपासून आहे गुन्हेगार
आरोपीसोबत तक्रारदार महिला पंजाबमध्ये राहात होती. यावेळी तिला समजले की पतीला चोरीच्या प्रकरणात यापुर्वीच दोषी ठरविण्यात आले आहे. यानंतर ती त्याला न सांगताच दिल्लीला निघून आली. नंतर तो व्यक्ती दिल्ली येथे पोहचला आणि महिलेला विश्वासात घेऊन त्याने आता सुधारणार असल्याचे सांगितले. यानंतर या दाम्पत्याने सोबत राहण्यास सुरूवात केली. नंतर आरोपीने महिलेचे दोन लाख रूपये चोरले. तेव्हा पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला.
शारीरीक संबंध ठेवले तर काय झाले, पत्नी तर होती
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. तक्रारदार महिलेने आरोप केला की, यानंतरही तो तिच्या घरी येत होता आणि सतत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवत होता. न्यायालयाने म्हटले, आरोपीने जेव्हा तक्रारदारासोबत जबरदस्तीने शरीरीक संबंध ठेवले त्यावेळी ती त्याची पत्नी होती आणि यासाठी हे बलात्काराचे प्रकरण होत नाही.
Visit : bahujannama.com