बहुजननामा ऑनलाइन – कोरोनामुळे तब्बल पाच महिन्यांपासून बंद असलेली एसटीची आंतरराज्य सेवा सुरू होणार आहे. सुरुवातीला महाराष्ट्र-गुजरात राज्य अशी बससेवा सुरू होत आहे. एसटीच्या धुळे विभागातून आजपासून धुळे-सुरत, शिरपूर-सुरत, दोंडाईचा-सुरत अशी आंतर राज्य बस सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी एका सीटवर एकच प्रवाशी या प्रमाणे एका बसमध्ये केवळ 22 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे.
आंतराज्य प्रवाशांना एसटीतदेखील मास्कचा वापर करणे आवश्यक राहणार आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानंतर टप्याटप्याने अहमदाबाद, बडोदा, तसेच मध्यप्रदेशसाठी आंतरराज्य बस सेवा सुरू होणार आहे. हळूहळू सर्वच मार्गांवरील एसटीची सेवा सुरळीत सुरू होणार आहे. 23 मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती. साधारण पाच महिन्यांच्या कालावधी नंतर एसटीची आंतरराज्य बस सेवा पुन्हा सुरु झाली आहे. 20 ऑगस्ट पासून एसटीची आंतर जिल्हा बस सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर आता आंतर राज्य बस सेवा सुरु झाल्यानं एसटीची सेवा सुरळीत सुरु होत आहे.