Squadron Leader Dies Of Dengue | पुणे: हवाई दलाच्या जवानाचा डेंगीने घेतला बळी

पुरंदर: Squadron Leader Dies Of Dengue | भारतीय हवाई दलामध्ये स्क्वाड्रन लीडर या वरिष्ठपदावर नागालँड येथे कार्यरत असणारे विजयकुमार ज्ञानेश्वर झेंडे Vijayakumar Dnyaneshwar Zende (वय ३६) यांचे डेंगीच्या आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दिवे या त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंतिमसंस्कार करण्यात आले.

यावेळी भारतीय हवाई दलातील, सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, सैनिक उपस्थित होते. त्यांच्याकडून विजयकुमार यांना मानवंदना देत तीन फैरी झाडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, राहुल शेवाळे, दिलीप वाल्हेकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे सभासद यांनी पुष्पचक्र व पुष्प वाहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

विजयकुमार यांनी आपली देशसेवा बजावत असताना भारत-रशिया युद्ध सरावात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कोरोना काळात इंडोनेशिया येथून ऑक्सिजन आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. विजयकुमार हे सुट्टीवर आले असताना त्यांना डेंगीची लागण झाली. यामध्येच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी ,भाऊ, बहीण, चुलते असा परिवार आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर झेंडे हे पोलीस खात्यातून उपविभागीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत.