नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियातून आलेली स्पुतनिक व्ही (Sputnik V) या कोरोनावरील लसीचा दर जाहीर करण्यात आला आहे. रशियामधून आयात केलेली कोरोना प्रतिबंधक लस म्हणजेच स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लसीची भारतातील किंमत जाहीर केली आहे. भारतामध्ये स्पुतनिक व्ही लस ९९५.४० रुपयांना मिळणार आहे. अशी माहिती रशियातून देशात आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीजने दिली आहे.
स्पुतनिक व्ही (Sputnik V) हि लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. ही लस ९१.६ टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती देखील दिली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे डॉ. रेड्डीजने रशियासोबत करार केला आहे. यानुसार या लशीचे उत्पादन भारतात केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.
या दरम्यान, स्पुतनिक व्ही लसीचा दर ९४८ प्रति डोस आहे. मात्र यामध्ये ५ टक्के GST लागत असल्याने या लशींचा दर ९९५.४ रुपये होतो. तर १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा डोस मिळणार आहे. तसेच, भारतात या लसीचे उत्पादन सुरु झाले की या लसीची किंमतही कमी होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लस देशभरातील बाजारांत उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले होते. भारतात सध्या देण्यात येत असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनपेक्षा रशियाची लस अधिक परिणामकारक आहे.