नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूपीएससी, एमपीएससी सारख्या सरकारी परीक्षा उत्तीर्ण होणं हि फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी लागणारी मेहनत आणि अभ्यासक्रम अत्यंत कठीण असतो. दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षेसाठी तयार होतात. आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करून पहिल्याच प्रयत्नात हि परीक्षा उत्तीर्ण होणं मोठी कौतुकाची बाब आहे. अशीच एक कहाणी आहे दिल्लीच्या सौम्या शर्मा हिची, आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करून पहिल्याच प्रयत्नात सौम्या IAS परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात नववं रँकिंग मिळवलं आहे.
वयाच्या १६ व्या वर्षी सौम्याला ऐकू येन बंद झालं, तिला ऐकण्यासाठी श्रवणयंत्राची गरज लागते. पण आपल्या ह्या मजबुरीने खचून न जाता तिने कठीण परिश्रम घेऊन यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला, वयाच्या २३ व्या वर्षी IAS अभ्यासक्रमास सुरुवात केली, तेदेखील कोणत्याही कोचिंग शिवाय आणि तिला यश देखील प्राप्त झालं.
एका मुलाखतीत बोलताना सौम्या सांगते, माझ्यासाठी यूपीएससी परीक्षा देणं कोणत्याही परीक्षेसारखंच अवघड होत. पण मी न घाबरता सगळ्या गोष्टीचं आणि अभ्यासक्रमाच व्यवस्थित प्लॅनिंग आणि वेळापत्रक तयार केलं. आणि त्यानुसार अभ्यास करत गेले. तिने दिल्लीच्या नॅशनल युनिव्हर्सिटीतुन LLB पूर्ण केलं, २०१७ पासून यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्याच वर्षात प्रिलिम्स आणि मेन्सही उत्तीर्ण झाली. महत्वाची बाब म्हणजे सौम्याला ऐकू येत नसल्याने तिला अपंगत्व श्रेणीतून फॉर्म भरण्यास सांगितले, परंतु सौम्या ने नकार देत इतर सामान्य श्रेणीतून फॉर्म भरून परीक्षा दिली.
यूपीएससी परीक्षेच्या ऐन वेळी तिची तब्येत बिघडली, तिला ताप आला. पण या गोष्टीवर मात करत तिने परीक्षा दिली. यावेळी तिचे आई-वडील आणि डॉक्टर देखील तिच्या सोबत होते. सौम्या हि शालेय जीवनापासूनच अत्यंत हुशार आणि मेहनती होती. त्यामुळे शाळेपासूनच तिचा अभ्यासाचा पाया मजबूत झाला होता.
इतर विद्यार्थ्यांना संदेश देताना ती सांगते कि, आपण रोज वृत्तपत्र वाचले पाहिजे, आपल्या अभ्यासक्रमाचे नीट वेळापत्रक करून त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, मागील प्रश्नपत्रिकांचा सराव केला पाहिजे, आपण जर मेहनत घेतली तर काहीच अवघड नाही. फक्त तुमच्यात इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.