मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सोनी वाहिनीवरील ‘कोण बनेगा करोडपती’ या कार्यक्रमावर निषेध व्यक्त केला जात होता. कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाच्या वेळी शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने राज्यभरातुन सोनी वाहिनीवर संताप व्यक्त केला जात होता. सोशल मीडियावरही सोनी वाहिनी आणि अमिताभ बच्चन यांना ट्रोल केले जात होते. त्यानंतर आता शिवप्रेमींच्या संतापानंतर सोनी टीव्हीने घडलेल्या प्रकरणाबद्दल सर्वांची माफी मागितली आहे.
शिवप्रेमींनी या प्रकरणी सोनी वाहिनीचा निषेध केला होता, राष्ट्रवादीनेदेखील आज वाहिनीच्या कार्यालयासमोर निदर्शने व्यक्त करणार असे सांगितले होते. तसेच भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील ट्विट करत, ‘ माफी मागावी अन्यथा कार्यक्रमाची लाईफलाईन शिल्लक ठेवणार नाही, ‘ अशी धमकी देखील दिली होती. त्यामुळे आता या प्रकरणी सोनी वाहिनीने माफी मागितली असून अनावधानाने हा प्रकार घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गुजरातहून आलेल्या स्पर्धक शाहेदा चंद्रन यांना हा प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा होता कि. ‘यांपैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबाचा समकालीन होता ?’ असा प्रश्न अमिताभ यांनी विचारला. त्यासाठी
१)महाराणा प्रताप
२) राणा सांगा
३) महाराणा रणजित सिंग
४) शिवाजी
या दिलेल्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने राज्यभरातून रोष व्यक्त केला जात होता.
Visit : bahujannama.com