मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परराज्यातून आलेल्या मजुरांचे अनेक हाल होत आहेत. त्यामुळे या मजुरांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. त्यासोबतच अभिनेता सोनू सुददेखील या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करत आहे. त्याने मुंबईत काम करणार्या कर्नाटकमधील मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर आता त्याने बिहार आणि झारखंडमधील मजुरांना गावी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. कर्नाटकमधील मजुरांना त्यांच्या गावी पाठविल्यानंतर सोनू सुदने उत्तर प्रदेशमधील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. त्याने मुंबईत काम करणार्या उत्तर प्रदेशमधील मजुरांसाठी मुंबईतून बस पाठविण्यास सुरुवात केली आहे.
यासाठी कायदेशीर परवानगीदेखील मिळविली आहे. आतापर्यंत मुंबईतील वडाळा येथून लखनौ, हरदोई, प्रतापढ आणि सिद्धार्थनगर यांसह बिहार, झारखंडसाठी बस रवाना करण्यात झाल्या आहेत. त्यामुळे विविध स्तरांमधून जनता सोनू सुदवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. देशात लॉकडाउनची घोषणा झाल्यापासून सोनू सतत विविध मार्गाने गरजुंची मदत करत आहे. त्याने आतापर्यंत अनेक गरजुंच्या जेवणाची सोय केली आहे. त्याचे काही हॉटेल्सदेखील डॉक्टर, नर्स यांच्यासाठी खुले केले आहेत. रमजानचा महिना सुरु असल्यामुळे अनेक गरजुंच्या घरी तो जेवणाची पाकिटेही देत आहे.