Solapur Crime News | गेल्या अडीच-तीन वर्षापासून पत्नी माहेरी, नांदण्यास येण्यास नकार, कोर्टात पोटगीचा दावा; संतापलेल्या पतीकडून सासरी चाकूहल्ला, सासऱ्याचा मृत्यू तर मेहुणा-सासू गंभीर जखमी

सोलापूर : Solapur Crime News | पत्नी नांदण्यास येत नसल्याने व सासू- सासरे पत्नीला नांदण्यासाठी पाठवत नसल्याने तसेच न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केल्याचा राग मनात धरून संतापलेल्या तरुणाने धारदार चाकूने सासरा, सासू व मेहुणा अशा तिघांवर वार केले. यामध्ये सासऱ्याचा मृत्यू झाला, तर मेव्हणा व सासू जखमी झाल्याची घटना घडली आहे. (Murder Case)

बापूराव मासाळ असे खून झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. तर मंगेश देविदास सलगर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवार (दि.२७) रात्री १२ वाजताच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथे घडली. याबाबत अभिषेक बापूराव मासाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील वडवळ स्टॉप परिसरात राहणाऱ्या मंगेश सलगर याचे लग्न रामहिंगणी येथील बापूराव मासाळ यांची मुलगी निशा सोबत झाले होते. मात्र गेल्या अडीच ते तीन वर्षापासून निशा ही माहेरीच राहत होती. दरम्यान मंगेश सलगर हा रविवार (दि.२७) रोजी रात्री १२ वाजताच्या दरम्यान रामहिंगणी येथील काळे वस्ती येथे सासुरवाडीत गेला होता.

पत्नी निशा नांदण्यास येत नसल्याने आणि त्यात सासू-सासरे पत्नीला नांदविण्यास पाठवित नाहीत यामुळे मंगेश निराश झाला होता. त्यातच न्यायालयात दाखल केलेला दावा या सर्व गोष्टीचा राग मनात धरुन त्याने धारदार चाकुने घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या सासरे बापूराव मासाळ यांच्या तोंडावर, अंगावर व पायावर चाकूने  भोकसून वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात सासरे बापूराव मासाळ यांचा मृत्यू झाला. यावेळी अभिषेक मासाळ आणि त्यांची आई बापूराव मासाळ यांना सोडविण्यासाठी गेले असता मंगेशने त्यांच्यावरही हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले.

त्यानंतर स्वतःच ११२ या क्रमांकावर फोन करून ‘मला वाचवा, मला याठिकाणी मारहाण करीत असल्याचे पोलिसांना सांगितले. मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देत आरोपीला ताब्यात घेतले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहोळ पोलीस ठाण्यात मंगेश सलगर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.