Solapur Crime News | प्रसुतीदरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू, न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सोलापूर: Solapur Crime News | प्रसुतीदरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शितल भाऊसाहेब करगळ (वय-२८) असे मृत्यू झालेल्या गरोदर मातेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR On Doctor)
करमाळा येथील विठ्ठल हाॅस्पीटलचे डाॅ.राम बिनवडे यांच्या विरोधात हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश करमाळा न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार करमाळा पोलीस स्टेशन येथे डाॅ.राम बिनवडे यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, याबाबत पती भाऊसाहेब करगळ यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. बिनवडे यांनी चुकीच्या पद्धतीने, बेजबाबदारपणे व निष्काळजीपणे ऑपरेशन केल्यामुळेच शितल करगळ हिचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शितल करगळ हिचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यास नातेवाईक गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे नातेवाईकांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने फिर्यादीचे म्हणणे ऐकून घेऊन डॉ.राम बिनवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार करमाळा येथे डॉ. बिनवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Comments are closed.