सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आज(सोमवार दि 16 सप्टेंबर) सदर बझार पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे. सरकारी कामात अडथळा निर्णाण केल्याप्रकरणी कोर्टाने प्रणिती शिंदे यांना अंतरिम जामीन मंजूर करत तीन दिवस म्हणजेच 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान सदर बझार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता प्रणिती शिंदे आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसह चौकशीसाठी हजर राहिल्यात.
नेमकं प्रकरण काय ?
पालकमंत्री विजयकुमार देशमुख बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी येत होते. त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी प्रणिती शिंदे व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 जानेवारी 2018 रोजी घडलेली ही घटना आहे.
3 दिवस सदर बझार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
सोलापूर कोर्टात या प्रकरणी खटला सुरू असताना आमदार प्रणिती शिंदे कार्टात सुनावणीला हजर नसल्याने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं होतं. यानंतर त्या कोर्टात हजर राहिल्याने त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. कोर्टाने त्यांना तीन दिवस म्हणजेच 16 ते 18 सप्टेंबर सदर बझार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही दिले.
‘सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीला हे सरकार मेंटली टॉर्चर करतंय’
याबाबत बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “सोलापूरातील शासकीय रुग्णालयात औषधांच्या दरांसंदर्भात आम्ही आंदोलन केलं होतं. यानंतर माझ्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यावर कितीही गु्न्हे दाखल केले तरीही मी गोरगरिबांसाठी नेहमी लढा देणार. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीला हे सरकार मेंटली टॉर्चर करत आहे.” असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला.