बहुजननामा ऑनलाईन – महिला दलाल उषा दोशी या ट्विटर अप्लिकेशनमध्ये जाहिरात देऊन कनिष्ठ कलाकार तरुणी आणि उच्चभ्रू मॉडेल यांच्या मार्फतीने हजारो रुपयांच्या मोबदल्यामध्ये सेक्स रॅकेट चालविणात असल्याची माहिती ठाणे गुन्हे पोलिसांना मिळाली होती. बुधवारी रात्री ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उषा यांना अटक केली. मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडकल यांना उच्चभ्रू मॉडेल, चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये कनिष्ठ कलाकार म्हणून भूमिका करणाऱ्या तरुणींकडून एक दलाल सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या दलालाशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी पोलिसांना मीरा रोड येथील उषा या महिलेचा मोबाइल क्रमांक दिला. यानंतर पोलिसांनी सापळा रचायला सुरुवात केली. याअंतर्गत कडलक यांच्या पथकाने उषाशी संपर्क साधला असता, उषाने एका मॉडेलसाठी ५० हजारांची बोली केली. सौदा पक्का झाल्यावर पोलिसांच्या बनावट गिऱ्हाइकाने उषाशी संपर्क केला. तेव्हा तिने ठाण्याच्या मासुंदा तलावाजवळील हॉटेल साईकृपा येथे येण्यास सांगितले.
याठिकाणी पोलिसांच्या पथकाने योजनेप्रमाणे उषाला रंगेहाथ पकडले. यावेळी तिच्या तावडीतून शरीरविक्रीसाठी आणलेले सहा तरुणींनचीही सुटका करण्यात आली. मुख्य दलाल आणि सूत्रधार असलेल्या तिचा साथीदार ट्विटरवर जाहिरात देऊन या तरुणींकडून जबरदस्तीने शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेत होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात उषासह दोघांविरुद्ध पिटांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्या साथीदाराचा शोध सध्या घेण्यात येत आहे.