जिनिव्हा : वृत्तसंस्था – कोरोना महामारीत संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आहे. अशावेळी प्रश्न विचारला जात आहे की, मोठ्यांसाठी मास्क जरूरी आहे, मग मुलांनी काय करावे? जागतिक आरोग्य संघटनेने आता मुलांना मास्क घालण्याबाबत गाईडलाइन जारी केली आहे. डब्ल्यूएचओच्या नव्या गाईडलाइननुसार 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी सुद्धा प्रौढांप्रमाणे मास्क घातला पाहिजे. संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीचे म्हणणे आहे की, मास्क घालण्याबाबत जगभरात जी गाईडलाइन्स जारी केले आहे, ती 12 वर्षांपेक्षा जास्त मुलांसाठी सुद्धा लागू आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले की, 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना सुद्धा कोरोनाचा धोका तेवढाच आहे, जेवढा मोठ्यांना आहे. जेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही, तसेच कोरोना वेगाने पसरत आहे, तेथे मुलांनी मास्क घातला पाहिजे.
डब्ल्यूएचओकडून मुलांमधील कोरोनाच्या धोक्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु तो घातक असू शकतो, याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. डब्ल्यूएचओनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले मोठ्यांप्रमाणे कोरोनाचा संसर्ग पसरवू शकतात. मात्र, डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे की, 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी मास्क घालणे बंधनकारक नाही.
6 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी दिशा निर्देश
डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे की, 5 वर्षांच्या मुलांना कोरोनाचा धोका जवळपास नाहीच. यासाठी या वयाच्या मुलांनी मास्क घालणे जरूरी नाही. तर 6 ते 11 वर्षांच्या मुलांना त्या जागेवर मास्क घालणे जरूरी आहे, जेथे कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे किंवा जेथे जास्त गर्दी आहे. खेळताना मुलांनी मास्क घालू नये. मुलांनी एकमेकांपासून अंतर ठेवून खेळावे. मैदानात मुलांची संख्या मर्यादित असावी.