मथुरा : वृत्तसंस्था – एका निवृत्त जवानाने रागाच्या भरात आपल्या लायसन्सच्या रिव्हॉल्वरमधून पत्नी आणि मुलीवर गोळी मारली. गोळी लागल्याने दोघी जखमी झाल्या, परंतु मुलीने जखमी अवस्थेत सुद्धा बापाच्या हातातून रिव्हॉल्वर खेचून त्याच्यावर गोळी झाडली. मुलीने झाडलेली गोळी वर्मी बसल्याने बापाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये घडली आहे.
मथुरा मधील नौहझील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीठोली गावातील या घटनेत किरकोळ घरगुती वादातून रिटायर्ड जवान चेतरामने लायसन्सच्या रिव्हॉल्वरने पत्नी आणि मुलीवर गोळी झाडली. गोळी लागल्याने आई आणि मुलगी दोघीही जखमी झाल्या. जखमी अवस्थेत जेव्हा मुलीने पाहिले की आईलाही वडीलांनी गोळी मारली आहे, तेव्हा जखमी मुलीने बापाच्या हातातील रिव्हॉल्वर हिसकावले आणि बापावर गोळी झाडली. मुलीने झाडलेल्या गोळीमुळे बापाचा जागीच मृत्यू झाला.
शेजार्यांनी जखमी आई आणि मुलीला रूग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत मथुराचे एसएसपी शलभ माथुर यांनी सांगितले की, एक कौटुंबिक वाद झाला होता, ज्यामध्ये निवृत्त जवानाने आपली पत्नी आणि मुलीवर गोळी चालवली. मुलीने बचाव करताना आपल्या वडीलांवरच गोळी झाडली, ज्यामध्ये वडीलांचा मृत्यू झाला. मुलगी आणि आईवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मुलगी आणि वडीलांनी एकमेकांवर गोळ्या का झाडल्या या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.