वर्धा : बहुजननामा ऑनलाइन – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नंदोरी मार्गावर एका तरुणाने तरुणी प्राध्यापिकावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असल्याची शक्यता दर्शविली जात आहे.
नंदोरी हा हिंगणघाट येथील मार्गावरून महालक्ष्मी किराणा दुकानासमोर सोमवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली असून या घटनेतील तरुणी गंभीर जखमी झाली आहे. उपचारानंतर आता तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. हा प्रकार विकेश नगराळे याने केला असून तो दारोडा येथे राहणारा असून ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले. तर त्याच्याबरोबर अजून दोन तरुणही होते.
पीडित तरुणी एस.टी. बसमधून उतरून महाविद्यालयाला जात असता विकेश याने तरुणीला महालक्ष्मी किराणा दुकानासमोर अडवत तिला काहीतरी विचारले. तरुणीने नकार दिल्यावर तरुणाने त्याच्यासोबत आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. त्यादरम्यान रस्त्यावर चांगलीच वर्दळ होती. पण अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लोकं गोंधळून गेले आणि त्याचाच फायदा घेत विकेश पळून गेला. नंतर या तरुणीच्या अंगावरील आग विझवत तिला रुग्णालयात नेले. तर या घटनेनंतर तरुणी गंभीर जखमी झाली असून पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.