जयपूर : वृत्तसंस्था – पिस्तूल दाखवत घरात घुसून तरुणीचे फिल्मीस्टाइलने अपहरण केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या जयपूरमधील किशनगंजमध्ये घडली आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी हा राजस्थान पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या पोलिसाचा मुलगा आहे.
आरोपी तरुण हा तरुणीच्या घरी जीप घेऊन आला. त्यानंतर पिस्तूल दाखवत तो घरात घुसून तरुणीला ओढत बाहेर आणले. त्यावेळी पीडितेच्या आई-वडिलांनी त्याला विरोध केला असता त्याने त्यांना जबर मारहाण केली. त्यानंतर पीडितेला जीपमध्ये घालून तो पसार झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणीच्या आई, वडिलांना रुग्णालयात दाखल केले.
आरडाओरडा ऐकून शेजारी घटनास्थळी आले. मात्र गुंडाच्या हातात पिस्तूल पाहून कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान पीडितेच्या आईने आरोप केला की, हेड कॉन्स्टेबलचा मुलगा सुनील याच्याविरोधात आम्ही अनेकवेळा तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलो होते. पण तिथे कोणीही आमचे ऐकले नाही. मुलीची लवकरात लवकर सुटका करावी, अशी विनंती आईवडिलांनी पोलिसांकडे केली आहे.