बहुजननामा ऑनलाइन टीम : सध्या अनेक भयानक बलात्काराच्या घटना घडत असताना दिसत आहे. हैदराबादनंतर बिहारच्या बक्सर आणि समस्तीपूरमध्ये बलात्कारानंत पिडीतेला जाळण्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. तर शुक्रवारी दरभंगामध्ये एका टेम्पो चालकाने पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. देशभरातून अशा घटना समोर येत असताना आज पहाटे उन्नावमध्ये वर्षभरापूर्वी बलात्कार झालेल्या पिडीतेचा मृत्यू झाला. गुरुवारी ती न्यायालयात जात असताना जामीनावर सुटलेल्या आरोपीने तिला दांड्याने मारहाण करत अंगावर रॉकेल टाकत पेटवून दिले होते. तिला काल दिल्लीला हलविण्यात आले होते. यालाच दुजोरा देणारी एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा घडली आहे.
अशीच एक घटना हरियाणामध्ये घडली आहे. पालवालमध्ये ५ डिसेंबरला १७ वर्षाच्या मुलीवर दुसऱ्यांदा सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलीवर गेल्या ऑगस्टमध्ये सामुहिक बलात्कार झाला होता. यानंतर पुन्हा तिच्यावर बलात्कार झाला असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. या मुलीने ऑगस्टमध्ये चार जणांनी अपहरण करुन बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांनीच पुन्हा तिचे अपहरण करत बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे.
पलवाल पोलिसांनुसार तिचे ४ डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. तक्रारीनंतर या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. पीडितेच्या पालकांनी या आरोपींना ठार करण्याची इच्छा व्यक्त केली. देशातील जनतेचीही हीच भावना आहे. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरला देशभरातून पाठिंबा मिळाला आहे. विविध स्तरातून स्वागत होत आहे. तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडत चालल्याने अशा घटना घडत असल्याची टीकीही होत आहे.
Visit : bahujannama.com