Pune News : गज कापून 2 आरोपींचे पोलीस कोठडीतून पलायन

भोर : बहुजननामा ऑनलाइन – पुणे-सातारा महामार्गावर भोर तालुक्यातील कापूरव्होळ येथे पोलिसांच्या वेशात येऊन गोळीबार करुन दहशत निर्माण करुन फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींनी पोलीस कोठडीतून पलायन केले. आरोपींनी लोखंडी गज कापून सिनेस्टाईलने पलायन केले. हा प्रकार उघडकीस येताच पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास घडली.
चंद्रकांत लोखंडे आणि प्रवीण राऊत अशी पलायन केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहे. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूरव्होळ येथे पोलिसांच्या वेशात येऊन गोळीबार करुन दहशत निर्माण करुन फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवर दरोडा टाकला होता. त्यानंतर आरोपी चारचाकी गाडीतून पळून गेले होते. या गुन्ह्यात आरोपींचा शोध घेत असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला होता. या घटनेत एक पोलीस अधिकारी जखमी झाले होते.
रायगड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत लोखंडे आणि प्रवीण राऊत यांना अटक केली होती. मागील सात दिवसांपासून आरोपींची भोर पोलीस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या ठिकाणी इतर गुन्ह्यातील आणखी चार आरोपी होते. राजगड पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी आरोपींच्या बंदोबस्तासाठी तैनात केले होते. आरोपींना मंगळवारी (दि.16) भोर न्यायालयात नेण्यात आले. परंतु, बुधवारी (दि.17) पहाटेच आरोपींनी लोखंडी गज कापून पोलीस कोठडीतून पलायन केले. फरार झालेल्या आरोपींचा शोध रायगड पोलीस घेत आहेत.
Comments are closed.