Shivsena Protest In Pune | पुणे :  शिवसेनेचे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र आंदोलन, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त नागरिकांचा उद्रेक…!! (Video)

Shivsena Protest In Pune | Pune: Shivsena's intense agitation against the chaotic management of Hadapsar-Mundhwa regional office, angry citizens' outburst against the inaction of the administration...!! (Video)

पुणे : Shivsena Protest In Pune | हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासनाचा बेजबाबदार, बेशिस्त व अकार्यक्षम कारभार गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या तक्रारींचे कारण ठरत असून याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आले. हडपसर परिसरातील शेकडो संतप्त नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. (Pramod Nana Bhangire)

प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. विशेष बाब म्हणजे, सत्ताधारी पक्षातील प्रमुख स्थान असलेल्या शिवसेनेनेच या गैरकारभाराच्या विरोधात उघडपणे आवाज उठवल्याने या आंदोलनाला विशेष राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

नागरिकांना मूलभूत सेवा वेळेवर न मिळणे,पिण्याच्या पाण्यात दूषित पाण्याचा पुरवठा,रस्त्यांवर बेकायदेशीर अतिक्रमणाचे साम्राज्य,क्षेत्रीय कार्यालयातील हजेरी प्रणालीतील अनियमितता, बायोमेट्रिक यंत्रणा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद,अधिकारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाहीत,नागरी समस्या सोडविण्यात प्रशासनाची टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत या सर्व मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांनी एकत्र येत ठोस आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान नागरिकांनी देखील आपले अनुभव आणि त्रास मीडिया समोर व्यक्त करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला टी स्टॉल , फ्रुट स्टॉल  थेट क्षेत्रीय कार्यालयात आणून  सर्वांसमोर ठिय्या मांडल्याने काही काळ  क्षेत्रीय कार्यालयाला  अतिक्रमित भाजी मंडईचे स्वरूप आले होते

 शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “हडपसर परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा त्रास सहन करत आहेत. आम्ही वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे आजचा संताप ओघातच होता. पिण्याच्या पाण्यातील दूषितता, रस्त्यांवरील अतिक्रमण, आणि अधिकारी वर्गाची बेजबाबदारी यामुळे संपूर्ण यंत्रणा ढिम्म झाली आहे. जर येत्या ८ दिवसांत प्रशासनाने सुस्थितीत कामकाज सुरू केलं नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन अधिक उग्र करेल व प्रशासनाला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम इशारा भानगिरे यांनी दिला.

हडपसर-मुंढवा परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण न होणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाची चाचपणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाही तर अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना पुकारेल असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे,  उपजिल्हाप्रमुख अमर घुले व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.