बहुजननामा ऑनलाइन टीम : विधानसभा निवडणुकीपुर्वीही भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा रंगली होती, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतल्याचे बोलले गेले. मात्र, नंतर खडसे यांनी आपली निष्ठा पक्षासोबत असल्याचे बोलून दाखविले. विधानसभा निवडणुकीत भाजपने कापलेले तिकीट आणि नंतर मुलगी रोहिणी खडसे यांचा पराभव यामुळे एकनाथ खडसे यांच्या नाराजीची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे. एकनाथ खडसे यांनीही एक पाऊल पुढे टाकत आता इतर पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे खडसे हे उतर मार्गाची चाचपणी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘एकनाथ खडसेंसोबत आम्ही अनेक वर्षे काम केले आहे. एकनाथ खडसे हे नुकतेच शरद पवार यांना भेटले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर खडसे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. त्यामुळे कोणी कुठेही भेटू शकतो. ही लोकशाही आहे. एकनाथ खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेऊ शकतात.’
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ‘महाविकास आघाडीमध्ये तीन वेगवेगळे पक्ष आहे. त्यांची चर्चा सध्या सुरु आहे. लवकरच खातेवाटप होईल. याबाबत उद्धव ठाकरे निर्णय देतील. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी झाली आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही तयार केला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आम्ही चांगले काम करू. राज्यातील विकास प्रकल्पाला कुठेही स्थगिती दिलेली नाही. आढावा घेण्याचे काम सुरु आहे. आमचा विधानसभेतील 170 आकडा आहे. तो भविष्यात आणखी वाढेल.’
Visit : bahujannama.com