मुंबई बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसमधील नेत्यांनी आपापल्या पक्षाना रामराम ठोकत आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. पिचड पिता- पुत्र, राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, कॉंग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ, संदिप नाईक यांच्यासह नगरसेवकांनी आज भाजपमध्ये जाहिर प्रवेश केला.
या सर्व नेत्यांनी मुंबईतील गरवारे क्लब येथे जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या नेत्यांसोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सभास्थळी जमली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, विनोद तावडे आदींसह प्रमुख भाजप नेते यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला जाहीरपणे रामराम ठोकला. मधुकरराव पिचड हे शरद पवारांचे खंदे समर्थक समजले जातात. या पिता पुत्रांनी आज भाजपमध्ये जाहिर प्रवेश केला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला वाट दाखवली. आम्हाला वाट दाखवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार असे प्रवेशावेळी पिचड म्हणाले.
तर चित्रा वाघ या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. त्यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संदिप नाईक यांनी ५२ नगरसेवकांसोबत प्रवेश केला. तर कॉंग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांनीही आज प्रवेश केला. कोळंबकर यांनी आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पक्षाचा राजीनामा दिला होता. कोळंबकर हे पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. तर साताऱ्याताली राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काल आपला आमदारकीचा राजीनामा काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला होता. त्यांनी राष्ट्रवादी सोडू नये यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले होते. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणत्याही स्थितीत विरोधी पक्षासारखे काम करत नसल्याने राष्ट्रवादी सोडत असल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले होते.