मुंबई बहुजननामा ऑनलाईन – सातारा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी न सोडण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले दिलजमाईचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरली. शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आज रामराम ठोकला. त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सभापतींकडे सोपवला असून उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत.
मागील अनेक वर्षापासून शिवेंद्रराजे व सातारचे खासदार उदयनराजे यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यात समेट घडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शिवेंद्रराजे राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा सुरु असताना शरद पवार यांनी उदयनराजेंचं मी बघतो, तुम्ही राष्ट्रवादीतच राहा. असं म्हटलं होतं. परंतु त्यांची दिलजमाई काही चालली नाही. आज शिवेंद्रराजे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सातारा विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले. उद्या सकाळी अकरा वाजता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बँकेचे संचालकही भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सातारा जावलीत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे.