अहमनगर : बहुजननामा ऑनलाईन – शिवजयंतीनिमित्त मंगळवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता नगरमधून सदभावना मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. मराठा सेवा संघाच्या महापालिका शाखेच्या पुढाकाराने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय मराठा सेवा नागरी पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने माणुसकीची भिंत उपक्रम होणार आहे.
नगरमध्ये सदभावना जनजागृती करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या मनपा शाखेचे अध्यक्ष सुरेश इथापे यांच्या पुढाकाराने १९ रोजी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. यात ५० मोटारसायकलस्वार, एक रिक्षा व सुमारे दीडशेवर महिला व पुरुष सहभागी होणार आहेत. माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ही रॅली सुरू होणार असून, शहरातील प्रमुख रस्ते तसेच सावेडी परिसरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरून सकाळी ११ वाजता लालटाकी येथील चौथे शिवाजी महाराज स्मारकाजवळ समारोप होणार आहे. यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा पतसंस्थेचे अध्यक्ष विजयकुमार ठुबे व उपाध्यक्ष सतीश इंगळे यांच्यासह अन्य सदस्यांच्या पुढाकाराने १९ रोजी माणुसकीची भिंत उपक्रम होणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हा उपक्रम होणार आहे. ज्यांच्याकडे वापरात नसलेले चांगले कपडे व गृहोपयोगी वस्तु असतील, त्यांनी त्या पतसंस्थेकडे दिल्यानंतर ज्यांना त्याची गरज आहे, त्यांनी त्यातील आपल्याला हवे ते घेऊन जायचे आहे.