उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला मदत केली होती. परंतु ही बंडखोरी केल्याने त्याचा चांगला परिणाम होणार नसल्याचे दिसत असून त्यांची पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची शक्यता दर्शविली जात आहे. तर दुसरीकडे पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांना पदावरून काढून टाकले आहे.
सोलापूर आणि उस्मानाबादमधील शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार असून त्या भेटीमध्ये तानाजी सावंत यांना पक्षातून हकालपट्टी केल्याबद्दल चर्चा आणि निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच लक्ष्मीकांत ठोंगे -पाटील यांच्या जागी आता पुरुषोत्तम बर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अगोदरच तानाजी सावंत हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असून आपल्या पुतण्याला उस्मानाबाद जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने उपाध्यक्ष पद नाकारल्यामुळे तानाजी सावंत यांनी बंडखोरी केली. तसेच मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराज असल्याचे तानाजी सावंत यांनी बोलून दाखवले होते.