पुणे : बहुजननामा ऑनलाईन – इंदिरा गांधी करीम लालाच्या भेटीला जायच्या असे वादग्रस्त विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. दैनिक लोकमत पत्रकारिता पुरस्काराचे वितरण संजय राऊत यांचं हस्ते आज पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथे होणार असून त्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राऊत यांनी मुंबईचे जुने अंडरवर्ल्ड पाहिले असल्याचेही सांगितले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला नुसतेच बघितले नसून त्यांना दम दिल्याचा धक्कदायक खुलासा संजय राऊत यांनी त्यावेळी केला.
संजय राऊत यांनी पुढे बोलताना स्टेपनी ही गाडीसाठी महत्वाची गोष्ट असल्याचे सांगितले. तसेच अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते महत्वाचे नेते असून आमची गाडी घसरणार नसल्याची खात्री असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘मी फार निर्ढावलेला माणूस आहे. राज्याचे नेतृत्व उद्धवच करू शकतात. आम्ही एक उत्तम कलाकृती निर्माण केली आहे’, असेही राऊत म्हणाले. काही गोष्टी रहस्यमयच असल्या पाहिजेत असे सांगत पडद्या आडच्या गोष्टी पडद्याआडच राहिल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. आम्ही हे सरकार चालवणार असून पाच वर्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्हाला राज्य चालवायचा चांगला अनुभव असून प्रत्येक खातं राज्यासाठी महत्वाचं असत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्राच्या मातीतले पक्ष आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
बाळासाहेब माझे सर्वस्व असून त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे, असे ते म्हणाले. तसेच राज ठाकरे हे आजही माझे चांगले मित्र असल्याचे त्यांनी सांगितले. पवार यांच्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्यावर माझा विश्वास आणि श्रद्धा आहे. आज जे सरकार बनले त्याला कुणी कोणी खिचडी म्हणत नाही. याचे नेतृत्व उद्धव करत असून पाठीशी पवार आहेत. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची परैस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माझा पिंड हा पत्रकारितेचाच असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.