पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – तळोजा जेलमधून बाहेर आल्यानंतर कुख्यात गुंड गाज मारणेने काढलेली मुंबई-पुणे महामार्गावरील जंगी मिरवणूक चांगलीच गाजली. याप्रकरणी गजा मारणे याच्यावर 3 गुन्हे दाखल करण्यात आले. गजा मारणे सुटल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते उपस्थित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गजा मारणेचे पॉलिटिकल कनेक्शन उघड झाले आहे.
या रॅलीत सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करुन पोलिसांकडून अटकसत्र सुरु केले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोरेगाव येथील नगरसेवक संजय पिसाळ आणि महाबळेश्वर येथील शिवसेनेचा तुलका अध्यक्ष संतोष शेलार यांचा समावेश आहे. तसेच काही सराईत गुन्हेगारांनादेखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही राजकीय मंडळींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कुख्यात गजा मारणे यांची 15 फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यावेळी त्याने 300 वाहनांच्या ताफ्यात जंगी मिरवणूक काढली. या प्रकरणी गजा मारणेविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दरोड्यासह रॅली काढल्या प्रकरणी दोन आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात असे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले.या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 59 जणांना अटक केली आहे. तर रॅलीमध्ये सहभागी झालेली 23 अलिशान वाहने जप्त केली आहेत. या गुन्ह्याचा तपास करीत असताना रॅलीसाठी पुणे, सातारा, नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांचा वापर झाल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर गजा मारणे फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. गजाला सातारा जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तो पोलिसांना शरण आला असल्याची चर्चा आहे. त्याला शरण आणून देण्यात सातारा जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादीचा एक नेता आणि पुणे शहरातील भाजपच्या एका नेत्याची महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.