Shirur Assembly Election 2024 | पारंपरिक मतदार संघ गमावल्याने भाजपात नाराजीनाट्य; शिरूर मतदारसंघात बडा नेता बंडाच्या तयारीत

October 26, 2024

पुणे: Shirur Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अगोदर अजित पवार शिरूर मधून लढणार अशी चर्चा होती. मात्र राष्ट्रवादीची (Ajit Pawar NCP) यादी जाहीर झाल्यानंतर ते बारामती (Baramati Assembly Election 2024) मधूनच लढणार असल्याचे निश्चित झाले.

शिरूर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जावा अशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती मात्र ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेली. राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर पाहिला मिळत आहेत.

त्यातच भाजप नेते प्रदीप कंद (Pradeep Kand) हे निवडणूक लढवणार की नाही? याबाबत ते उद्या (दि.२७) रविवारी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे शिरूरमध्येही बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण वर्तवली जात आहे.

याबाबत बोलताना प्रदीप कंद म्हणाले, शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघाची पारंपरिक जागा गमविल्याचे शल्य प्रत्येक भाजप कार्यकर्त्यात आहे. तसेच या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार निवडणूक लढणार म्हणून भाजप कार्यकर्त्यानी त्यांचा आदर ठेवत महायुतीतून त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली होती.

मात्र ते ही निवडणूक लढणार नसतील तर त्यांनी ही जागा भाजपला सोडणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने स्थानिक भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा माझ्यावर मैत्रिपूर्ण अथवा स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवण्याचा दबाव आहे. आपण याबाबत वरिष्ठ नेत्यांना आपल्या भावना कळविल्या असून येत्या रविवारी समर्थकांच्या बैठकीत निर्णय घेऊन निवडणूक लढविणार की नाही? याचा निर्णय घेणार असल्याचे प्रदीप कंद यांनी यावेळी सांगितले.

हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा राहिलेला आहे. मात्र यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना विद्यमान आमदार अशोक पवार (Ashok Pawar MLA) यांनी दिवंगत आमदार बाबूराव पाचरणे यांना पराभूत करत हा विधानसभा संघ मिळवला होता.

बाबुराव पाचरणे यांच्या निधनानंतर कुठलाही मोठा नेता भाजपकडून विधानसभेसाठी पाहायला मिळाला नाही. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फुट पडली आणि अशोक पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत न जाता शरद पवारांच्या सोबत राहणे पसंत केले. त्यामुळे अशोक पवार यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान होते.

शिरूर विधानसभेसाठी अजित पवारांनी अशोक पवार यांच्या विरोधात माऊली कटके यांना उमेदवारी दिली. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे पाहायला मिळत आहे.