बहुजननामा ऑनलाइन टीम – शिर्डीचे साईमंदिर सुरू झाले तसे दाक्षिणात्य भाविकांकडून विमान(Shirdi Airport) कंपन्यांकडे विचारणा सुरू झाली आहे. कोविडचा प्रादुर्भाव सुरू असला तरी किमान निम्म्या आसन क्षमतेएवढे प्रवासी मिळतील, असे विमान(Shirdi Airport) कंपन्यांनी गृहीत धरले आहे. त्यानुसार येत्या 5 डिसेंबरपासून नियमित सेवा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तोपर्यंत इंडिगो कंपनीने दिल्लीसाठी दिवसाआड सेवा सुरू केली आहे, तर 5 डिसेंबरपासून स्पाईसजेट कंपनीने वाहतूकसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.
साई मंदिरातील दर्शन व्यवस्था ब-यापैकी सुरू झाली आहे. दर्शनाचे ऑनलाइन बुकिंग करून दाक्षिणात्य व दिल्लीतील भाविक शिर्डीत येत आहेत. त्यांच्याकडून विमान कंपन्यांकडे विचारणा सुरू होत आहे. त्यामुळे कोविडच्या छायेत विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन इंडिगो आणि स्पाईसजेट या दोन कंपन्यांनी केले आहे. येत्या 5 डिसेंबरपासून शिर्डीसाठी एकाचवेळी दिल्ली, हैदराबाद व बंगळुरू आदी तीन महानगरांसाठी सेवा सुरू करण्याची तयारी स्पाईसजेट या कंपनीने सुरू केली आहे. आसनक्षमतेच्या निम्मे प्रवासी मिळाले तरी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर ही सेवा सुरू ठेवली जाणार आहे. प्रवासी वाहतुकीसह कार्गो सेवाही सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन व्यापा-यांनी माल पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.
तर खबरदारीचा उपाय म्हणून कोविड चाचणी न करता आलेल्या प्रवाशांसाठी विमानतळावर अॅंटीजेन चाचणीची सुविधा विमानतळावर सरकारी यंत्रणेने उपलब्ध करून दिली आहे.