Sharad Pawar Sabha In Pune | शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा? शरद पवारांचा पुण्यातील सभेमधून सवाल

पुणे: Sharad Pawar Sabha In Pune | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान खडकवासला मतदारसंघातील धनकवडीत प्रचार सभेत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
“सिंधदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भाजपने भ्रष्टाचार केला. जे छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करायला थांबत नाहीत, ते सामान्य लोकांसाठी काम करतील? यावर विश्वास कसा ठेवायचा”, असा सवाल शरद पवार यांनी महायुतीला केला आहे.
शरद पवार म्हणाले, ” सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक किल्ला उभा केला, तो गेले अनेक वर्षे समुद्रात टिकला आहे, त्याला कधीही धक्का बसला नाही. त्या किल्ल्याच्या जवळ भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. त्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पण तो अवघ्या आठ महिन्यात कोसळला. वाऱ्याने पुतळा कोसळ्याचे सांगण्यात आले. इंडिया गेट भागात १९६० साली यशवंतराव चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला पण त्याला आजपर्यंत धक्कासुद्धा लागलेला नाही.
मग सिंधुदुर्ग येथीलच पुतळा का पडतो? यावरून पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होते. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करण्यास थांबत नाहीत, महाराष्ट्रातील सामान्य लोकांनी यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा”, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
Comments are closed.