Sharad Pawar On Dilip Walse Patil | शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, ” गद्दारी करणाऱ्या गणोजीला आता सुट्टी नाही”

आंबेगाव: Sharad Pawar On Dilip Walse Patil | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राज्यभर प्रचारदौरा करताना दिसत आहेत. लोकसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १० पैकी ८ खासदार निवडून आल्याने पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेचा रिझल्ट येण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ दिलीप वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात जात शरद पवार यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. “साडे तीनशे वर्षांपूर्वी गणोजी शिर्केने छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी केली, ती गद्दारी अद्यापही महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळे गणोजीला आता सुट्टी नाही”, ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी वळसे-पाटलांना इशारा दिला आहे.

तसेच ज्यांना पद, शक्ती आणि अधिकार दिले, तेच गद्दार झाले. आता या विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा, करा, करा, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.

शरद पवार म्हणाले, मी दिलीप वळसे पाटील यांना संधी दिली. आमदार केलं, मंत्री केलं. विधानसभेचे अध्यक्ष केलं. मात्र त्यांनी विचाराशी गद्दारी केली आणि आमची साथ सोडली. जो गद्दारी करतो, त्याला माफी नसते, असं म्हणत त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत वळसे पाटील यांना धडा शिकवा, त्यांना पराभूत करा, असे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले, ” स्वर्गीय दत्तात्रय वळसे पाटील यांनी मला साथ दिली. ते कायम माझ्या सोबत राहिले. तसंच त्यांच्या मुलाला माझ्या सोबत काम करण्याची इच्छा होती. मला पण काम करणारी माणसं हवी होती. त्यामुळे मी दिलीप वळसे पाटलांची निवड केली आणि ते माझ्यासोबत आले. त्यांनी सर्व कामं शिकून घेतली. त्यांना मी संधी दिली, सर्व दिलं.

एवढं सगळं काही देऊनही या माणसानं साथ सोडण्याची भूमिका घेतली. त्यांनी आमची साथ सोडली हे लोकांना आवडलं नाही, ते आज सांगत असतील की आम्ही पवारसाहेबांना मानतो तर त्यात काही तथ्य नाही”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.