Sharad Pawar On Ajit Pawar | बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही, असं म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘उद्या कुणी म्हणत असेल की ….’

November 16, 2024

सातारा: Sharad Pawar On Ajit Pawar | बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Election 2024) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अजित पवारांनी बारामतीतील एका सभेत बोलताना शरद पवार हे लवकरच राजकारणातून निवृत्त होणार असून त्यानंतर बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. त्यामुळे भावनिक होऊ मतदान करू नका, असे आवाहन केले होते.

अजित पवार म्हणाले, ” तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही काही भावनिक करायचा प्रयत्न केला, तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. शरद पवारांनी सांगितलं आहे की दीड वर्षांनी ते पुन्हा उभे राहणार नाहीत, निवडणूक लढवणार नाही, खासदारही होणार नाहीत. त्यानंतर कोण बघणार आहे? कुणात तेवढी धमक आहे? कुणात तेवढी ताकद आहे याचा विचार करा”, असे अजित पवार यांनी म्हंटले होते.

यासंदर्भात आता शरद पवार यांनीही भाष्य केले आहे. ते सातारा येथे माध्यमांशी बोलत होते. शरद पवार म्हणाले, ” उद्या कुणी म्हणत असेल, मीच देशाचा प्रमुख, तर तू म्हण बाबा माझी काही तक्रार नाही. पण, हे लोकांनी म्हटलं पाहिजे ना. मी म्हणून काय उपयोग आहे”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

लोकसभेला जशी गंमत केली, तशी विधानसभेला करू नका, असंही अजित पवार म्हणाले होते. यासंदर्भात विचारलं असता, ” गंमत म्हणजे काय? त्यांना मतं दिली नाहीत, हेच ना. दुसरं काय? लोकांचा अधिकार आहे तो. त्यांना योग्य वाटलं ते केलं”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.