मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रपिता महात्मा गांधींजींबद्दल अवमानकारक ट्विट करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केली आहे. याबाबतचं तसं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलंय. नोटांवरुन गांधीजींचा फोटो हटवण्याची मागणी निधी चौधरी यांनी केली होती. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असं कृत्य करणं गंभीर असल्याचंही पवारांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
मुंबई महापालिका उपायुक्त निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांचे नोटांवरील फोटो आणि जगभरातील पुतळे हटविण्याची मागणी करणारं धक्कादायक विधान सोशल मीडियावर केले आहे. शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे केवळ लांछनास्पद नसून सक्त कारवाईस पात्र आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात राज्यात शासकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तींकडून असा गंभीर प्रकार घडावा व त्याकडे शासनाने कानाडोळा करावा ही दुर्देवी बाब असून मुख्यमंत्र्यांनी या अधिकार्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीचं निमित्त साधून त्यांचे नोटेवरील फोटो आणि जगभरातील पुतळे हटविण्याची मागणी करणारं ट्विट केलं होतं. तसंच महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचं आभारही मानलं होतं. त्यामुळे वादंग निर्माण होताच चौधरी यांनी ते ट्विट डिलीट करत ते केवळ उपरोधिक ट्विट होतं असं स्पष्टीकरण दिलं होतं.
या विधानात महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरणही करण्यात आले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासकीय अधिकार्याकडून असा प्रमाद घडावा व शासनाने त्याकडे काणाडोळा करावा हे अशोभनीय आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 2, 2019