नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील शाहीन बाग येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून आंदोलन सुरु असून सरकारविरोधी घोषणा आणि संविधान वाचवण्याच्या दाव्यांव्यतिरिक्त रोज नवीन देखावे पाहायला मिळत आहेत.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी झारखंडमधील निवडणूक सभेत सांगितले होते की सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलनकर्ते कोण आहेत हे त्यांच्या कपड्यांवरून ओळखले जाऊ शकते. त्यांनी हे वक्तव्य कॉंग्रेसवर निशाणा साधण्यासाठी केले असून अल्पसंख्यांक खासकरुन मुस्लिम वर्गावर भाष्य केले असल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या याच विधानाला आव्हान देत गुरुवारी शाहीन बागेत एक दृश्य पाहायला मिळाले.
गुरुवारी सर्व धर्मातील लोकांनी त्यांच्या धर्माप्रमाणे पूजा-प्रार्थना केली. दरम्यान सर्व लोकांनी एकमेकांना पाठिंबा दिला. एकीकडे शगुफ्ताने पूजेसोबत मंत्राचा जप केला तर दुसरीकडे उपासना आणि शिवानी कलमाचे वाचन केले. याशिवाय शीख आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी इतर धर्माच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला.
जश्न-ए-एकतामध्ये लोकांनी फक्त शैलीच तर आपला पेहरावही बदलला. उदाहरणार्थ हिंदूंनी टोपी घातली तर मुस्लिम महिला साड्यांमध्ये दिसल्या. काही लोकांनी डोक्यावर पगडी बांधली. नंतर निषेध करणार्या महिलांनी मोदी आणि अमित शहा यांना शाहीन बागेत येण्याचे आमंत्रण देत सांगितले की या आणि आमच्या कपड्यांवरून आम्हाला ओळखा. आम्ही हिंदुस्थानी आहोत. धर्माच्या आधारे आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका, असेही आंदोलक म्हणाले. जश्न-ए-एकता येथे उपस्थित निदर्शक म्हणाले की या शाहीन बागेत मुस्लिम लोकच नाही तर गुरमीत, राम, रहीम आंदोलनाला बसले आहेत.