बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना प्रतिबंधक लस खरेदीची पहिली ऑर्डर केंद्र सरकारकडून पुण्यातील ‘सीरम इंस्टिट्यूट’ला देण्यात आल्याची माहिती समोर(Serum Institute) आली आहे. तसेच लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. लसीच्या एका नगाची किंमत 200 रुपये इतकी असणार असल्याची माहिती सीरम इन्सिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे.
देशात 16 जानेवारीपासून लसीकरण
सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून कोविशील्ड लशीची निर्मिती केली आहे. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरु होणार आहे. सुरुवातीला देशातील अत्यावश्यक सेवेतील 3 कोटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील नागरिक आणि गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल. दरम्यान सीरम इंस्टिट्यूटकडून लशीच्या वाहतुकीसाठीची देखील तयारी पूर्ण झाली आहे. कूल-एक्स कोल्ड चैन लिमिटेट कंपनी देशाच्या कानाकोपऱ्यात लशीची वाहतूक करणार आहे. सीरम इंस्टिट्यूटबाहेर कोल्ड स्टोरेज वाहन देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत.