नांदगाव : बहुजननामा ऑनलाईन – तालुक्यातील बंजारा समाजाचा ‘तांडा’ असलेली न्यायडोंगरी, कसाबखेडा, कासारी, पोही, मूळडोंगरी, लोहशिंगवे आदी भागांत होळी साजरी केली जाते. समाजातील नात्याने दीर – भावजयी यांचा या होळी सण साजरा करतानाच उत्साह काही वेगळाच असतो. चेष्टेचं नातं असलेल्या समाजातील पुरुषांना लाकडी दंडुक्याने मार खात ठोकलेला खुंटा उपसवण्याचे आव्हान या महिलांनी (गेरनी) दिलेले असते. एकूणच होळी सण साजरा करताना ‘धुंड’ या खेळात आपल्या संस्कृती जतन आम्ही करत असल्याचे काळू राठोड यांनी सांगितले.
डोंगरदऱ्यात भटकंती करून लोकसंस्कृतीचे जतन करत ‘बंजारा’ समाजाच्या तांड्यावर सध्या होळी उत्सवाची धूम सुरू आहे. इतरत्र होळी पेटल्यांतर बंजारा समाजात दुसऱ्या दिवसानंतर होळी सण साजरा केला जातो. तांड्यावरील सर्व बंजारा समाज बांधव नायकाच्या घरी जाऊन होळी खेळण्याची परवानगी मागतात व त्यासाठी मान म्हणून दोन रुपये दंडही (रप्या) आकारला जातो. परवानगी मिळाल्यानंतर होळीची मोठी धूम या समाजात साजरी होते. ज्यांच्या घरात नव्याने मुलगा जन्माला आला आहे. त्यांच्या घरासमोर होळीनिमित्ताने ‘धुंड’ हा खेळ खेळला जातो. त्यानुसार पोही (ता. नांदगाव) येथील वाल्मीक राठोड यांच्या घरासमोर तांड्यावरील बंजारा समाज एकत्र जमून ‘धुंड’ या खेळाला सुरुवात झाली.
बाळाला खाली बसवून त्यावर ‘ठोळी’ धरून बंजारा गीते म्हणण्यास सुरुवात झाली. बाळाचे नामकरण झाल्यानंतर ‘खुंटा उपटणे’ या खेळाला सुरुवात झाली. मीराबाई पवार, ढवळीबाई राठोड, धर्मीबाई राठोड, दुर्गाबाई चव्हाण, सविता राठोड, अंजना चव्हाण, रुख्मिणी राठोड या महिलांसह ज्ञानेश्वर राठोड, काळू राठोड, भिका राठोड, भावलाल चव्हाण, शेषराव चव्हाण, छगन राठोड, दिग्विजय राठोड, मागू राठोड, देवीदास राठोड, प्रकाश राठोड, लक्ष्मण चव्हाण, शिवाजी राठोड, अनाजी राठोड आदींनी या खेळात सहभाग नोंदविला. यापूर्वी महिलांकडूनही ‘गुंजा’ (गव्हाच्या पिठापासून तयार केलेला) हिसकावण्याचा प्रयत्न पुरुष करत असतात. त्यावेळीही इतर महिला या पुरुषांना लाकडी दंडुक्याने चोप देतात. संपूर्ण गाव ‘धुंड’ हा खेळ बघण्यासाठी तेथे उपस्थित असतो. या खेळापूर्वी ज्याच्याघरी ‘धुंड’ असेल त्यांच्या घरी रात्रभर गाणे म्हणत जागरण केले जाते. बंजारा समाजाने आपली परंपरा लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही जपले आहे.