पुणे : बहुजननामा ऑनलाईन – विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने ‘राजा ढाले आणि आंबेडकरी चळवळ’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होणार आहे.
शनिवारी (दि. ३ ऑगस्ट) सायंकाळी ४.३० वाजता मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात हा परिसंवाद पार पडणार आहे.
जेष्ठ पत्रकार अरुण खोरे, दलित चळवळीतील लेखक अर्जुन डांगळे, शरणकुमार लिंबाळे, दिवाकर शेजवळ, इंदिरा आठवले, राजा ढाले यांच्या पत्नी दिक्षा ढाले, कन्या गाथा ढाले या परिसंवादात मनोगते मांडणार आहेत. रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक, कवी, लेखक होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू परिसंवादात उलगडले जाणार आहेत, अशी माहिती संयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि संम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिली.