नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू प्रकरणात चीनला मदत केल्याच्या आरोपाचा सामना करत असलेली जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोरोना साथीच्या (Covid-19) विषयी 32 देशांतील 239 शास्त्रज्ञांनी एक खुले पत्र लिहिले आहे, ज्यात डब्ल्यूएचओवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की कोरोना विषाणू हवेतून देखील पसरतो, परंतु डब्ल्यूएचओ याबद्दल गंभीर नाही आणि संघटनेने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील यावर मौन बाळगले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार 239 शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की लोकांना हवेच्या छोट्या कणांमध्ये असलेल्या कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की त्यांना याचा पुरावा मिळाला आहे आणि त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला या आजाराशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओला सांगितले की त्यांनी या विषयाला गांभीर्याने घ्यावे. तसेच पुढील आठवड्यात हा पेपर एका सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची देखील घोषणा त्यांनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कोरोनो विषाणू आजार प्रामुख्याने एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत छोट्या थेंबांनी पसरतो, जे शिंकताना किंवा बोलताना तोंडातून बाहेर पडतात.
डब्ल्यूएचओ दावे स्वीकारत नाही
या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की शिंका आल्यानंतर हवेत दूरवर पसरणारे मोठे थेंब किंवा लहान थेंब एका खोलीत किंवा एखाद्या निश्चित ठिकाणी उपस्थित लोकांना संक्रमित करण्यास सक्षम असतात. ते बराच काळ बंद जागेत हवेत उपस्थित राहतात आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना संक्रमित करतात. तथापि, डब्ल्यूएचओने न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संशोधकांनी दिलेला पुरावा पुरेसा नाही. डब्ल्यूएचओचे डॉ. बेनेडेटा अलेंगरन्झी यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, ‘विशेषत: गेल्या दोन महिन्यांत आम्ही बर्याच वेळा असे म्हटले आहे की हा आजार हवेच्या माध्यमातून पसरू शकतो यावर आम्ही विचार करीत आहोत परंतु हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस किंवा कोणतेही स्पष्ट पुरावे नाहीत.’