पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा आज मध्यरात्रीपासून बंद राहतील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या इथे कुठेही कोरोना व्हायरसची उत्पत्ती झालेली नाही. तरीही जनतेत एक भीती आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांव्यतिरीक्त पिंपरी चिंचवड आणि पुणे येथील शाळा सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबईत अद्याप तसं केलेलं नाही. जास्त भीती पसरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी स्वत:हून खासगी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जिथे गरज आहे तिथे त्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी” असंही ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं. इतकेच नाही तर जनेतनं अनावश्यक प्रवास टाळायला हवा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मॉल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी जाणंही लोकांनी टाळायला हवं असंही ते म्हणाले.