पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने वाढतो आहे. पुण्यात मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयातील शववाहिका कमी पडू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने मृतदेह नेण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे (RTO) १० शाळेच्या बसची मागणी केली होती. मनपाच्या मागणीवरून RTO कडून स्कुल बस शववाहिका म्हणून वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून पुणे शहरामधील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत गेला. यानंतर मार्च, एप्रिल महिन्यात देखील रुग्णाचे प्रमाण अधिक वाढले. यामध्ये बळींची संख्या देखील वाढत आहे. या वरून उपलब्ध असलेल्या शववाहिका कमी पडू लागल्या असल्याने मनपाच्या मोटार वाहन विभागाने कोरोना मृतदेहांची वाहतूक करण्याकरिता १० स्कुल बसची (Tempo Traveler) मागणी करत एक पत्र RTO विभागाकडे देण्यात आले होते. यावरून RTO ने आता परवानगी दिली आहे. तर प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी परवानगी याबाबतचे पत्र पालिकेला दिले असून १० स्कुल बस सुद्धा उपलब्ध केल्या आहेत.
१० स्कुल बस सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या वाहनांमधून मृतदेहांची वाहतूक केली जाणार असल्याने बसमधील सीट काढून मोकळं केलं आहे. या बसमुळे शववाहिकेसाठी लागणारे वेटिंगही कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, मनपा कडून वाहनाचे भाडे चालक भत्ते आणि मानधन दिले जाणार आहे. RTO ने ठरवून दिल्याप्रमाणे दररोज १६०० रुपये भाडे दर हे मनपा भाडे देणार आहे. शाळा बंद असल्याने रोजगार बंद आहे. पण आता काही प्रमाणात स्कुल चालकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच महाराष्ट्र वाहतूक सेना, जिल्हाध्यक्ष एकनाथ ढोले म्हणाले, RTO कडून काही सामाजिक कार्यकर्त्यांना स्कुल बस मिळवून देण्याबाबत कळविले होते. यावरून आम्ही सर्वांनी प्रयत्न करून १० स्कुल बस वाहने मिळवून देण्यात मदत केली. महापालिकेला या काळात या वाहनांची मदत होणार असून स्कुल बस चालकांनाही रोजगार मिळणार आहे.