नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – पेट्रोलपंप कंपन्यांनी ६० हजार पेट्रोलपंप डिलरशिपची जाहिरात काढली असून एससी, एसटी वर्गातील तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. या संधीचा लाभ तरुणांनी घेण्याचे आवाहन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष गोपाल वासनिक यांनी केले. एससी, एसटी वर्गासाठी पेट्रोलपंप डिलरशिपमध्ये २२.५ टक्के कोटा राखीव असून यात त्यांना फार मोठी गुंतवणूक करावी लागणार नाही.
केवळ जागेसाठी करावी लागणारी गुंतवणूक वगळता इतर सर्व सोयी व पंप उभारणी कंपनीतर्फे केली जाणार आहेत. देशभरात जवळपास १४ हजार पेट्रोलपंप एससी, एसटी वर्गासाठी राखीव असून, ही एकही जागा शिल्लक राहू देऊ नका, असे आवाहन वासनिक यांनी केले आहे. डिक्कीने यापूर्वी बल्क एलपीजी ट्रक टँकरमध्ये देशभरात अंदाजे दोन हजार एससी, एसटी तरुणांना पेट्रोलियम कंपन्यांमध्ये एलपीजी ट्रक टँकर ट्रान्सपोर्टर बनविले आहे. पेट्रोलपंप डिलरशिपचा अर्ज ऑनलाइन कसा भरवा, यासाठी डिक्की विदर्भतर्फे विदर्भातील तरुणांसाठी तीन कार्यशाळांचे आयोजन पेट्रोलियम कंपन्यांच्या सहकार्याने करण्यात आले. तसेच ऑनलाइन अर्ज भरून देण्याची सुविधा डिक्की विदर्भ कार्यालय छत्रपती चौक, नागपूर येथे करण्यात आली असून या सुवेधेचा लाभ घेण्याचे आवाहन गोपाल वासनिक यांनी केले आहे.
नागपूर : जाधव कुणबी समाज हा अमरावती, वर्धा, परतवाडा यासह नागपुरात विखुरला आहे. या समाजाने संघटित शक्ती उभी करून समाजभवनासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावे. यासाठी आवश्यक जमीन आणि निधी शासनस्तरावर उपलब्ध झाल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होईल. याकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार सुनील केदार यांनी यावेळी दिले.