अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – अनुसूचित जाती जिल्हा वार्षिक उपआराखड्याच्या खर्चाच्या अहवालानुसार राज्यातील ३६ जिल्ह्यांत अनुसूचित जाती उपआराखड्यासाठी २ हजार ५३२ कोटी ७१ लाख ५० हजारांचा निधी देण्यात आला. त्यापैकी १ हजार ५१३ कोटी ६२ लाख ७ हजारांचा खर्च झाल्याने अद्यापही १ हजार कोटी शिल्लक असल्याचे अधोरेखित झाले आहे. अनुसूचित जाती जिल्हा वार्षिक उपयोजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला कोट्यवधीचा निधी दिला जातो.
राज्यातील बहुतांश जिल्ह्याची स्थिती खर्चाबाबत बिकट आहे. परभणी जिल्ह्यासाठी ५७ कोटी ३४ लाखांची तरतूद होती. पैकी ५२ कोटी ७० लाख ८१ हजार खर्चून हा जिल्हा पुढे आहे. येथील खर्चाची टक्केवारी ९१.९२ एवढी आहे. नांदेड जिल्ह्यासाठी १४० कोटी ३ लाखांची तरतूद होती. पैकी ११८ कोटी २३ लाख ६७ हजारांचा खर्च या जिल्ह्यात झाला असून खर्चाची टक्केवारी ८४.४४ आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी ३३ कोटी ४८ लाखांची तरतूद होती. पैकी २७ कोटी ७४ लाख ३३ हजारांचा खर्च झाला असून टक्केवारी ८२.८७ एवढी आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी २६ कोटी ९९ लाख १४ हजाराच्या तरतुदीतून २१ कोटी ३४ लाख १८ हजारांचा खर्च झाला आहे.
खर्चाची टक्केवारी ७९.०७ एवढी आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी ६३ कोटी ७६ लाखातून ५० कोटी ७ लाख ९१ हजाराचा खर्च झाला आहे. खर्चाची टक्केवारी ७८.५४ एवढी आहे. वाशीम जिल्ह्यासाठी ५७ कोटी २७ लाख ४१ हजाराच्या तरतुदीतून ४४ कोटी ४२ लाख ४६ हजाराचा खर्च झाला असून ही टक्केवारी ७७.५६ एवढी आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी १२६ कोटी ७ लाख ३० हजाराचा निधी देण्यात आला होता. पैकी ९३ कोटी १५ लाख ५१ हजार खर्चून या जिल्ह्याने ७३.८९ टक्के खर्च केला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी १३६ कोटी ६० लाख २५ हजाराची तरतूद होती. पैकी ९५ कोटी ६६ लाख खर्चून या जिल्ह्याने ७०.३ टक्के खर्च केला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी ९६ कोटी ९२ लाखांची तरतूद होती. त्यापैकी ६६ कोटी ११ लाख ७२ हजार खर्चून या जिल्ह्याने ६८.२२ टक्के खर्च केला आहे. लातूर जिल्ह्यासाठी ११८ कोटी २७ लाख ५२ हजारांची तरतूद होती. पैकी ७९ कोटी ७७ लाख ८१ हजार खर्चून या जिल्ह्याने ६७.४५ टक्के निधी खर्च केला आहे.