सांगली : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभर चांगलेच वादंग उठले आहे. ठिकठिकाणी लोक रस्त्यावर येत निषेध करीत आहेत. सांगली येथे संभाजी भिडे यांच्या ‘ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेच्या वतीने सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाण साधला आहे. ‘त्यांनी थेट राऊत यांना पदावरून हाकलण्याची मागणी केली आहे.
समाजस्वास्थ्य बिघडू नये याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी : भिडे
यावेळी बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, बोलताना तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. त्यांना राष्ट्रपतीच्या इतकाच मान मिळाला पाहिजे. आमचा बंद कुठल्याही पक्षाच्या वा शिवसेनेच्या विरोधात नाही. उलट शिवसेना हवी या मताचा मी आहे. मात्र, समाजस्वास्थ्य बिघडू नये याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यायला हवी. राऊत यांना कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पदावरून काढावे, अशी मागणी भिडे यांनी केली.
काय आहे वाद
‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे.