Satara Crime News | नातेवाईक मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, 27 वर्षीय तरुणाचे अपहरण करून खून

सातारा : Satara Crime News | नातेवाईक मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून २७ वर्षीय तरुणाचे सात जणांनी अपहरण करून त्यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रहिमतुल्ला सलीम आतार (वय २७, कासेगाव, ता- वाळवा, जि – सातारा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रहिमतुल्लाच्या भावाने दिलेल्या फिर्यादी वरून कराड तालुका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Murder Case)
पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एकाचा नातेवाईक असलेल्या कराडमधील मुलीबरोबर रहिमतुल्ला आतार याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. रहिमतुल्ला हा मोबाईल दुरूस्तीचा व्यवसाय करीत असल्याने त्याचे कराडला नेहमी येणे-जाणे होते. सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास संशयितांनी दोन चारचाकी वाहनातून येत वाठार (ता. कराड) येथून रहिमतुल्लाचे अपहरण केले.
त्यानंतर त्याला रेठरे व कासेगाव येथे विविध ठिकाणी नेऊन दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोखंडी सळी, लाकडी दांडके व पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण केली. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत रहिमतुल्लाला संशयितांनी त्याच्या घरी सोडले. नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सूरू असताना रहिमतुल्लाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून काही तासात ७ संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Comments are closed.