सातारा : बहुजननामा ऑनलाईन – कारागृहात असलेल्या दोन परदेशी आरोपीनी विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. तसेच सीसीटीव्हीची तोडफोड करत पोलिसांना देखील मारहाण केली. सातारा जिल्हा कारागृहात हा प्रकार घडला. त्यामुळे पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.
सर्गीस व्हिक्टर मानका (वय-31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय-25 दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) हे दोघेही न्यायालयीन कोठडीत सातारा जेलमध्ये आहेत. याप्रकरणी कारागृहातील हवालदार सुरेश पाटील यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,वाई येथे रो-हाऊसमध्ये कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी दोन्ही संशयित कारागृहात आहेत. दोघांनी राडा करत 15 खोली विभागातील क्रमांक 5 मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड केली आहे. तसेच या दोघांनी कारागृह कर्मचारी संदीप फाळके आणि रमेश ओव्हाळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इतर पोलिसांनी पकडून त्यांच्यावर नियंत्रण मिळवले.