नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ३४ वर्षीय सना मरीन यांना फिनलँडमध्ये पंतप्रधानपदासाठी निवडले आहे. सध्या त्या जगातील कोणत्याही देशातील सर्वात तरुण पंतप्रधान असणार. त्या सध्या फिनलँडच्या परिवहन मंत्री आहेत. सना मरीन या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या म्हणून पंतप्रधानपदावर निवडल्या गेल्या आहेत. फिनलँडच्या सरकारच्या अध्यक्षपदी सना या तिसऱ्या महिला नेता आहे.
५५ लाख लोकसंख्या असलेल्या देशात एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण सना मरीन यांची पंतप्रधानपदाची निवडणूक पंतप्रधान एन्टी रिने यांच्या राजीनाम्यानंतर झाली. एन्टी रिने यांना मंगळवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला कारण आघाडी सरकारमधील एका पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. पोस्टल स्ट्राइक त्यांनी योग्य पद्धतीने हाताळला नाही असा आरोप होता.
त्याचबरोबर पंतप्रधानपदासाठी नाव उघड झाल्यानंतर सना मरीन म्हणाल्या की पुन्हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी आम्हाला बरीच कामे करावी लागतील. त्या म्हणाल्या की, – मी माझे वय आणि माझे लिंग याबद्दल कधीही विचार केला नाही. मी नेहमी या गोष्टींचा विचार केला आहे ज्यामुळे मी राजकारणात आले आणि लोकांचा विश्वास जिंकला.
Visit : bahujannama.com