Sanjay Raut On Eknath Shinde | शिंदे मंत्रिमंडळातील कच्चं मडकं, शहा गुजरातला गेल्यावर ‘जय महाराष्ट्र’ म्हणत नाहीत; संजय राऊत

मुंबई : Sanjay Raut On Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोरच जय गुजरातचा नारा दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यामुळे शिंदे यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडत ‘तो कार्यक्रम गुजराती समाजाचा होता. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे,’ असे शिंदे यांनी म्हटले. यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातले कच्चे मडके आहे. ते सध्याच्या राजकीय परिस्थितीने गोंधळलेले आहेत. त्यातून त्यांच्याकडून अशा प्रकारचे विधाने होतात. आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानात आहे. गुजरात आणि महाराष्ट्र कधीकाळी एकच होता. एकनाथ शिंदेंना माहिती नसेल. बडोदा हे मराठा संस्था आहे. बडोदा आणि गुजरातवर गायकवाड आणि भोसले यांचे राज्य होते, म्हणून अमित शहा किंवा मोदी बडोद्याला गेल्यावर जय महाराष्ट्र म्हणत नाहीत.
पुढे ते म्हणाले की, इंदूर, ग्वाल्हेर हे होळकर आणि शिंदे यांची मराठी राज्य आहेत. मी फडणवीस यांना सांगू इच्छितो की, पेशवेदेखील तिकडेच गेले होते. इतिहास मलादेखील माहीत आहे. योगी आदित्यनाथ हे तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाही, ते जय उत्तर प्रदेशच म्हणतील. त्यामुळे उगाचच सारवासारव करू नका. महाराष्ट्राला अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करत आहात. खरे म्हणजे फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणत आहेत. उत्तेजन देत आहेत.